जळगाव समाचार | ९ मे २०२५
पाहलगाम (काश्मीर) येथे मागील आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ७ मे रोजी पाकिस्तानात ‘सिंदूर ऑपरेशन’ राबवले. या हवाई मोहिमेत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरातील सुट्टीवर असलेल्या जवानांना पुन्हा सीमारेषेवर तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या संदर्भात पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचे उदाहरण उल्लेखनीय आहे. नुकताच ५ मे रोजी त्यांचा विवाह पार पडला होता. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांना सेवेत पुन्हा रुजू होण्याचे आदेश मिळाले. देशसेवा सर्वोच्च मानत मनोज पाटील यांनी आपल्या पत्नीला आश्वासन देत तात्काळ सीमारेषेवरील कर्तव्यासाठी रवाना झाले.
त्यांच्या या देशभक्तीपूर्ण निर्णयाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मनोज पाटील यांचे अभिनंदन करत, “आमचा सैनिक एक नव्हे, तर दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करूनच विजय मिळवेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.