भडगाव हॉटेल दुर्घटनेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू…

जळगाव समाचार | १९ सप्टेंबर २०२५

भडगाव तालुक्यातील बसस्थानक परिसरातील हॉटेल मिलन येथे रविवारी गॅस गळतीमुळे भीषण आग लागून हॉटेल मालकासह त्यांचा मुलगा व ग्राहकांसह १३ जण जखमी झाले होते. त्यामध्ये गंभीर जखमी झालेला हॉटेल मालकाचा मुलगा सोहिल रफीक मणियार (२८) यावर धुळे येथे प्राथमिक उपचारांनंतर छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनकच राहिल्याने गुरुवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला असून शुक्रवारी भडगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेबाबत सुरुवातीला हॉटेलमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची चर्चा होती. मात्र, पोलिस तपासात हॉटेल मालकाच्या मुलाने संपलेला सिलिंडर बदलल्यानंतर झालेल्या गॅसगळतीमुळेच ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाले. अचानक आगीचा भडका उडाल्याने हॉटेलमधील ग्राहक व मालक गंभीररीत्या भाजले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढे जळगाव, पाचोरा व धुळे येथे हलविण्यात आले. रुग्णवाहिका चालक निळू पाटील, भैया पाटील, सागर पाटील व गोलू शिंदे यांनी तत्परतेने जखमींना रुग्णालयात पोहोचवल्याने अनेकांचे प्राण वाचले.

अचानक झालेल्या या स्फोटामुळे बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जोरदार आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर धावले. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सोहिल मणियारच्या निधनाने भडगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here