जळगाव समाचार | २६ मार्च २०२५
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथील अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीवर मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जधारकांनी हप्ते भरूनही, ते रक्कम त्यांच्या खात्यात न भरता दुसरीकडे वळवण्यात आल्याने एका शेतमजुराचे घर बँकेने सील केले आहे. या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळसखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथील विजय चिंचोले (वय 26) यांनी गृहकर्ज घेतले होते. काही कारणांमुळे त्यांचे सात हप्ते थकीत राहिले होते. त्यांनी 52,000 रुपये वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याकडे जमा केले. मात्र, कोळी यांनी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता, थकीत कर्ज (NPA) खात्यात वर्ग करून ते खातेच बंद केले. परिणामी, कर्जफेड झाली नसल्याचे दाखवून फायनान्स कंपनीने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई केली.
या प्रकारामुळे आर्थिक फसवणूक झाल्याने विजय चिंचोले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी, वरिष्ठ अधिकारी विजय आचलकर आणि आदिती तळवलकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल गोरख पाटील करीत आहेत.

![]()




