जळगाव समाचार डेस्क | २४ ऑगस्ट २०२४
उद्या दि. २५ ऑगस्ट रोजी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या तयारीत पावसामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. जळगाव शहराजवळील विमानतळाच्या समोरील मोकळ्या जागेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाच्या सततच्या हजेरीमुळे मंडपात ठिकठिकाणी पाणी साचले असून, चिखलामुळे कार्यक्रमाच्या तयारीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना उपस्थित राहायचे आहे, आणि त्यांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मंडपासाठी वॉटरप्रूफ व्यवस्था केली असली तरी, पाण्याचा शिरकाव थांबवता आला नाही. त्यामुळे मंडपात सर्वत्र पाणी आणि चिखल साचला आहे, ज्यामुळे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाला धावपळ करावी लागत आहे.
महायुतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी वेळोवेळी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे. अचानक निर्माण झालेल्या पावसाच्या संकटामुळे मदत व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी तळ ठोकून तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आकाश निरभ्र न झाल्यामुळे आणि चांगले ऊन न पडल्यामुळे चिखल कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता बाहेरून मोठ्या प्रमाणात कोरडी माती आणि मुरूम आणून मंडपात महिलांसाठी बसण्यायोग्य जागा तयार करण्याचे आव्हान आयोजकांसमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि मंत्रीमंडळावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी मोठा ताण पडला आहे.

![]()




