Monday, December 23, 2024
Homeजळगावहातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...

हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

 

जळगाव समाचार डेस्क;

जिल्ह्यासह राज्यभरात मागच्या महिन्यात गायब असणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वांनाच जबरदस्तरित्या झोडपून काढले आहे. पावसाच्या जोरदार सरींनी कुठे पाणी तुंबले तर कुठे पूल वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई सहन करणाऱ्या अनेक खेड्यापाड्यांना वरूण राजाने सुखावले आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने हातनूर धरणात दि. 7 रोजी पाणलोट क्षेत्रामध्ये 314 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सकाळी 11 वाजता दहा गेट एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामधून 19105 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दि.7 रोजी हातनुर धरणाचे सकाळी नऊ वाजता 4 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून 7628 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यावेळेस हातनुर धरणात 55.67 टक्के पाणीसाठा होता. सकाळी दहा वाजता सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून 11442 क्युसेस पाणीसाठा नदीत सोडण्यात येतोय तर पाणीसाठा 55.9 टक्के होता. तर सकाळी 11 वाजता दहा दरवाजाने एक मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीच्या पात्रात १९१०५ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे व सध्याला धरणात 56.29 टक्के पाणीसाठा आहे.
अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी 10 गेट १.०० मी. उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत १९१०५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासांत २५,००० ते ३०,००० क्युसेक पर्यंत विसर्ग हातनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
काही तासात हा विसर्ग पंचवीस ते तीस हजारापर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page