जळगाव समाचार डेस्क। ९ ऑगस्ट २०२४
राज्यातील गुटखा विक्रीवर असलेल्या बंदीला धुडकावून, मुक्ताईनगर परिसरातून गुटख्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या तस्करीविरोधात कारवाई करताना, एक गुटख्याचे वाहन ताब्यात घेऊनही त्यास परस्पर सोडून दिल्याच्या गंभीर प्रकारामुळे पाच पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असली तरी, मध्य प्रदेशातील मोकळ्या विक्रीमुळे सीमावर्ती भागांतून गुटख्याची तस्करी वाढली आहे. महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांच्या पथकाने अलीकडेच मोठ्या प्रमाणात गुटख्याचे वाहने जप्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार स्वत: गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले होते. मात्र, या वाहनावर पुढील कोणतीही कारवाई न करता ते सोडून देण्यात आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलीस महानिरीक्षकांनी सखोल चौकशी करून मुक्ताईनगर पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक राहूल बोरकर आणि चार इतर पोलिस कर्मचारी – हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी, निखील नारखेडे आणि नाईक सुरेश पाटील यांना निलंबित केले आहे.
मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी या निलंबनाची पुष्टी केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील काही पोलिसांच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुटखा तस्करीच्या वाढत्या प्रकारांमुळे आणि त्यामागे पोलिसांचा हात असल्याच्या शक्यतेने या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.