जळगाव ठरतय गोळीबाराचे केंद्रबिंदू; आता रिक्षाचालकाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार…

जळगाव समाचार | २७ एप्रिल २०२५

जळगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे, मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीत, २४ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजता, एका रिक्षाचालकाच्या घरावर थरारक गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.

२६ वर्षीय राम विश्वास बोरसे हे त्यांच्या कुटुंबासह या भागात राहतात आणि रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. काही वर्षांपूर्वी, २०२१ मध्ये, त्यांचा मित्र दिनेश चौधरीसोबत वाद झाला होता. तेव्हापासून दिनेश सतत शिवीगाळ आणि दमदाटी करत होता. नुकतेच १ एप्रिल रोजी देखील राम यांना मारहाण करण्यात आली होती.

२४ एप्रिलच्या रात्री, राम हे भावाला सोडून घरी परतले आणि जेवण करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला. ते आणि त्यांच्या वडिलांनी धावत जाऊन पाहिलं, तर दोन तरुण कंपाउंडमध्ये आणि एक तरुण दुचाकीवर बसलेला दिसला. वडिलांनी आरडाओरड करताच तिघेही दुचाकीवरून पसार झाले.

पोलिस तपासात उघड झालं की, हल्लेखोरांपैकी एक दिनेश चौधरी होता. गोळी लोखंडी गेटवर आदळून फुटली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राम यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि मंगळवारी दिनेश चौधरीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here