जळगाव समाचार | ५ मार्च २०२६
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात बुधवारी (दि. ४ मार्च) पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास संशयित गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठलागातून मोठा गोंधळ निर्माण झाला. अमळनेर पोलिसांना एका संशयित वाहनाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अमळनेरहून जळगावपर्यंत त्या वाहनाचा पाठलाग केला. संबंधित वाहन शहरात दाखल झाल्यानंतर आकाशवाणी चौक परिसरात काही स्थानिक तरुणांनी पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने वाहनाचा पाठलाग केल्याचे सांगितले जाते. पहाटे हे वाहन मास्टर कॉलनीत शिरताच ते अडविण्याच्या प्रयत्नात परिसरात जमाव जमा झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
या दरम्यान किरकोळ दगडफेक झाल्याने एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकींचे नुकसान झाले. परिस्थिती चिघळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पहाटेच्या गोंधळानंतर घटनास्थळी उभ्या राहिलेल्या दुचाकी सकाळी घेण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही तातडीने Government Medical College and Hospital, Jalgaon येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय व MIDC Police Station, Jalgaon परिसरात गर्दी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मास्टर कॉलनीसह संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. संबंधित प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

![]()




