जळगाव समाचार डेस्क | २४ नोव्हेंबर २०२४
मागील आठवड्यात मोठा दिलासा देणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये या आठवड्यात पुन्हा मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोन्याने दरवाढीचा गुलाल उधळला, तर चांदीने माघार घेतली.
सोन्याच्या दरात या आठवड्यात तब्बल 3,000 रुपयांनी वाढ झाली. 22 कॅरेट सोन्याचा दर 72,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 78,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याचसोबत चांदीनेही सुरुवातीला 2,500 रुपयांची झेप घेतली, मात्र आठवड्याच्या अखेरीस स्थिरावली. सध्या एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये आहे.
सोन्याचा दरवाढीचा प्रवास
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 1,300 रुपयांनी घसरले होते. मात्र, 18 नोव्हेंबरपासून दरवाढ सुरू झाली. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोन्याने 660, 760, 550, 330 आणि 870 रुपयांची वाढ नोंदवली. अशा प्रकारे आठवडाभरात सोन्याने 3,000 रुपयांची उसळी घेतली.
चांदीची किंमत स्थिरावली
चांदीने 19 नोव्हेंबर रोजी 2,000 रुपयांची तर 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांची वाढ नोंदवली. मात्र, त्यानंतर चांदीत कोणताही मोठा बदल दिसून आला नाही.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,787 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,253 रुपये आहे. 18 कॅरेट सोने 58,340 रुपये आणि 14 कॅरेट सोने 45,505 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सराफा बाजारातील दरांमध्ये तफावत का?
आंतरराष्ट्रीय व वायदे बाजारात कोणतेही कर नसल्याने दर कमी असतात. मात्र, सराफा बाजारात कर व इतर शुल्कांचा समावेश होतो, ज्यामुळे किंमतींमध्ये तफावत दिसते.
जागतिक बाजारातील आर्थिक घडामोडी व भविष्यातील संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.