जळगाव समाचार | १७ मार्च २०२५
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून, दोन्ही धातूंचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शनिवारी सोने ८८,४०० रुपये प्रति तोळा तर चांदी १,००,७०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढली. जीएसटीसह सोन्याचा दर ९१,०५२ रुपये आणि चांदीचा दर १,०३,७२१ रुपये झाला आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेत घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांचा यावर परिणाम होत आहे. १२ मार्च रोजी चांदीच्या दरात १,००० रुपयांनी वाढ होऊन तो ९९,००० रुपये प्रति किलो झाला. १३ व १४ मार्चला हे दर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी पुन्हा १,७०० रुपयांची वाढ झाली आणि चांदीने एक लाखाचा टप्पा पार केला.
याचप्रमाणे, १२ मार्चला सोने ८६,६०० रुपये प्रति तोळा होते. १३ मार्चला त्यात ७०० रुपयांची वाढ होऊन ८७,३०० रुपये झाला. शनिवारी त्यात आणखी १,१०० रुपयांची वाढ होऊन तो ८८,४०० रुपयांवर पोहोचला.
चांदीने पुन्हा गाठला १ लाखाचा टप्पा
२३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदीने पहिल्यांदाच १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर काही दिवस दर कमी झाले होते. मात्र आता पुन्हा चांदी १,००,७०० रुपयांवर पोहोचली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.