सोन्याच्या दरात पुन्हा वाढ ; सोनं १ लाखाचा उंबरठ्यावर…

जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातही सोन्याच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

सध्या २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सुमारे ९३,४०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,८०८ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. काही तज्ज्ञांच्या मते, लवकरच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतो.

सोनं खरेदी करताना हॉलमार्किंग प्रणालीची खात्री करणे आवश्यक आहे. २४ कॅरेटवर 999, २२ कॅरेटवर 916, आणि १८ कॅरेटवर 750 अशी शुद्धतेची खूण असते. दागिने बनवण्यासाठी प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

जरी सध्या दर वाढत असले, तरी काही विश्लेषकांनी भविष्यात मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या प्रति औंस सोने ३,१९८ डॉलर दराने विकले जात असून, ते १,८२० डॉलरपर्यंत घसरू शकते, असा अंदाज आहे. त्यानुसार भारतात सोन्याचा दर ५४,००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

सोनं खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारातील दर नीट तपासावेत आणि विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच खरेदी करावी, वाढत्या मागणीमुळे दरात चढ-उतार होत राहणार असल्याने गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here