ऐन लगीनसराईत सोनं 84 हजार पार; ग्राहकांची चिंता वाढली…

 

जळगाव समाचार डेस्क | ३१ जानेवारी २०२५

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असताना सोन्याच्या किमतींनी नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात सतत वाढ होत असून, गुरुवारीही (३१ जानेवारी) त्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. या वाढत्या दरामुळे ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले असून, सोन्याच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली आहे.

जळगावच्या सुवर्णपेठेत गुरुवारी सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ८१७०० रुपयांवर पोहोचला. जीएसटीसह हा दर ८४१५१ रुपये झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल ११०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीही मागे राहिलेली नाही. चांदीचा दर १ हजार रुपयांनी वाढून प्रति किलो ९४००० रुपये झाला आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरातील झालेली वाढ
२२ जानेवारी: पहिल्यांदाच ६०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ८०६०० रुपयांवर गेला.
२९ जानेवारी: ८०० रुपयांची वाढ होऊन दर ८१४०० (जीएसटीसह ८३०१८) रुपयांवर पोहोचला.
३१ जानेवारी: आणखी ३०० रुपयांची वाढ होऊन दर ८१७०० (जीएसटीसह ८४१५१) रुपयांवर स्थिरावला.

सोन्याच्या वाढत्या किमतींसाठी अनेक घटक जबाबदार आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेतील व्याजदर कपात, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आगामी अर्थसंकल्पानंतर या दरांमध्ये आणखी काही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहावे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here