मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा: गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड, प्रवाशांचा संताप

जळगाव समाचार डेस्क| ११ सप्टेंबर २०२४

मध्य रेल्वेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा त्रास सातत्याने वाढत आहे. आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे मार्गावर मोठा खोळंबा झाला असून, गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे परिसरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा स्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या बिघाडामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या रांगा लागल्या असून, अनेक गाड्या कल्याण स्थानकात एकामागोमाग एक उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, त्यांना उशीर होत आहे.

मध्य रेल्वेच्या या सततच्या विस्कळीत सेवेबद्दल प्रवासी संतप्त आहेत. कर्जत, कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्याने दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली आहे. लोकल गाड्या अनियमित वेळांवर धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने अस्वस्थता वाढली आहे.

मध्य रेल्वेवरील गाड्या नेहमीच उशिरा धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेषतः कर्जत, कसारा, कल्याण मार्गावरील सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. आजच्या बिघाडामुळे प्रवाशांनी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.
मध्य रेल्वेवरील अशा वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. कार्यालयात उशिरा पोहोचणे, प्रवासातील त्रास, वाढलेली गर्दी यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here