जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२६
राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील गोटन उपखंडातील टालनपुर कस्ब्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, राजेंद्र यांच्या ९ वर्षीय कन्या दिव्या हिचा शाळेतील सकाळच्या प्रार्थनेदरम्यान संशयित हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दिव्या ही पाचवी इयत्तेत शिक्षण घेत होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे ७ वाजता खासगी शाळेत पोहोचली होती. प्रार्थना सुरू असताना ती विद्यार्थ्यांच्या रांगेत उभी असताना अचानक बेशुद्ध पडून जमिनीवर कोसळली. या घटनेने शाळा परिसरात एकच खळबळ उडाली.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, दिव्या अचानक खाली पडल्याचे स्पष्ट दिसून येते. शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत तिची प्राथमिक काळजी घेतली आणि तिला तातडीने टालनपुर कस्ब्यातील रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय मतानुसार, हृदयाचे ठोके अचानक थांबणे हे मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने दिव्याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, या कुटुंबावर चार महिन्यांत दुसऱ्यांदा दुःखाचा आघात झाला आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दिव्याचा मोठा भाऊ अभिषेक (वय १६) याचाही सुमारे चार महिन्यांपूर्वी अचानक मृत्यू झाला होता. सलग दोन अपत्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजेंद्र यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण टालनपुर कस्बा या घटनेने शोकाकुल झाला आहे. इतक्या लहान वयात हृदयविकाराच्या संशयित झटक्याने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

![]()




