जळगाव समाचार | 10 मे 2025
विनापरवानगी उभारलेल्या धोकादायक गतीरोधकावरून दुचाकी उधळल्याने आईच्या हातातून पडून पाच महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आमोदा-घार्डी रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. मृत बालिकेचे नाव गायत्री संदीप सोनवणे असून तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देवगाव येथे संदीप संदीप सोनवणे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या पत्नी ज्योती संदीप सोनवणे या सध्या माहेरी कोळन्हावी येथे गेल्या होत्या. संदीप सोनवणे हे त्या दिवशी पत्नीला घेण्यासाठी गेले होते आणि परत येताना दुचाकीवर आमोदा गावाजवळून देवगावकडे जात होते.
या दरम्यान, अमोदा-घार्डी रस्त्यावर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता उभारलेला एक गतीरोधक त्यांच्या दुचाकीच्या मार्गात आला. गतिरोधक अत्यंत उंच व चुकीच्या पद्धतीने बांधलेला असल्याने त्यावरून जाताना संदीप यांची दुचाकी अचानक उधळली. या वेळी त्यांच्या पत्नीच्या हातात असलेली पाच महिन्यांची चिमुकली गायत्री रस्त्यावर जोरात आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.