जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५
यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २५) सायंकाळी घडली. रात्रीपर्यंत ती घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांनी शोध घेतला. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिंचोली येथील प्रज्ञा सुरेश साळुंखे (वय २०) ही तरुणी मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या शेतशिवारातील बकऱ्यांच्या गोठ्यात गेली होती. बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी ती भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीवर गेली. ती हंडा व बादलीच्या साहाय्याने पाणी काढत असताना अचानक पाय घसरून ती विहिरीत पडली आणि पाण्यात बुडाली.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रज्ञा घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना एका विहिरीजवळ बादली व हंडा आढळून आला. यावरून कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी विहिरीत पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना काहीही दिसले नाही.
बुधवारी सकाळी ग्रामस्थ व कुटुंबीयांनी पुन्हा विहिरीत शोध सुरू केला. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने पाण्यात चित्रण करणारे विशेष कॅमेरे मागवण्यात आले. कॅमेऱ्याद्वारे पाहिले असता प्रज्ञाचा मृतदेह विहिरीच्या तळाशी खोल पाण्यात असल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
प्रज्ञाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे आणि डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. यावल पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करत आहेत.