जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५
नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून, गिरीश महाजन यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.
राज्यात सत्ता स्थापन होऊनही नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अंतिम झालेला नव्हता. 18 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदांसाठी नावांची घोषणा केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडसाठी निर्णय स्थगित करावा लागला. या पदांवरून महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे द्यायचे, यावर अजूनही चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना हे पद भरत गोगावले यांच्याकडे द्यायचे आहे, तर अजित पवार यांना आदिती तटकरे यांना संधी द्यायची आहे. त्यामुळे या दोघांनी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्ला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने या मोठ्या आयोजनासाठी भाजपनेच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली आहे. गिरीश महाजन यांची यापूर्वीच कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तेच पालकमंत्री राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.