जळगाव समाचार डेस्क | १२ फेब्रुवारी २०२५
रावेर तालुक्यातील थेरोळा गावातील एका २२ वर्षीय तरुणामध्ये गिलियन बरे सिंड्रोम (GBS) सदृश्य लक्षणे आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संबंधित तरुण कुंभमेळा प्रयागराज येथून परतल्यानंतर आजारी पडला होता. त्यानंतर त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील तपासणीसाठी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोग्य विभागाने तत्काळ ॲम्बुलन्सद्वारे रुग्णाला रावेर ग्रामीण रुग्णालयात नेले आणि तिथून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले. GBS ही एक दुर्मिळ पण गंभीर तंत्रिका संबंधी समस्या आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या नसांवर हल्ला करते. यामुळे हात-पाय बधिर होणे, कमजोरी येणे, चालण्यात अडचण, तसेच श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
सध्या महाराष्ट्रात विशेषतः पुणे जिल्ह्यात GBS च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य विभाग आधीच अलर्ट मोडवर आहे. पुण्यात सिंघगड रोड परिसरात अनेक रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यभरात या आजारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हात-पायांमध्ये मुंग्या येणे, कमजोरी, किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.