जळगाव समाचार | १० जून २०२५
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून गावठी कट्टे घेऊन जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यातील पाल येथील जंगल परिसरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईने जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रीला मोठा आळा बसला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उत्सव काळात समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शस्त्र विक्रीवर कारवाईसाठी आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. ८ जून रोजी सहाय्यक फौजदार रवी नरवाडे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील सिरवेल परिसरातून दोन व्यक्ती गावठी कट्टे विक्रीसाठी जळगाव जिल्ह्यातील रावेरमार्गे येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, नितीन चाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील आणि चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांच्या पथकाने पाल येथील जंगल परिसरात सापळा रचला. काही वेळाने काळ्या रंगाच्या दोन मोटारसायकलीवर दोन तरुण संशयित त्या मार्गावर येताना दिसले. पोलीस त्यांना थांबवू लागले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, म.प्र.) आणि निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, म.प्र., हल्ली रा. सिरवेल महादेव) अशी आहेत. त्यांच्याकडून MP-10-ZC-9650 (TVS Raider) आणि MP-10-MV-1462 (TVS Sport) या दोन मोटारसायकली, दोन मोबाईल हँडसेट आणि दोन गावठी कट्टे असा एकूण ₹1,70,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत.