जळगाव समाचार | १ सप्टेंबर २०२५
शहरातील स्वराज्य अभ्यासिकेत यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक उत्साह, भक्तीमय वातावरण आणि विविध उपक्रमांच्या आयोजनाने विशेषत्वाने साजरा करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या उत्सवामध्ये मान्यवरांनी आरतीचा मान स्वीकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक उत्साहवर्धक केला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींच्या हस्ते आरती करून शुभारंभ झाला. दुसऱ्या दिवशी लेखा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी आरती करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या कार्यातील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला. यावेळी अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थी मिलिंद पाटील यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा सत्कार केला. तिसऱ्या दिवशी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आरोग्यदूत जितेंद्र गवळी यांनी आरती केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व करिअरमध्ये आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्ष दीपक पाटील यांनी पुष्पगुच्छ, तर संचालक ओम बोंडे यांनी शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
चौथ्या दिवशी ट्रॅफिक पोलिस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी आरतीचा मान स्वीकारला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी एमपीएससी मेन्स परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. पाचव्या दिवशी हेमंत बोंडे व सौ. प्रियांका बोंडे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन संपन्न झाले. पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
शेवटच्या दिवशी, ३१ ऑगस्ट रोजी, गणेश कॉलनी येथील स्वराज्य अभ्यासिकेतून आयएमआर कॉलेजपर्यंत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात व डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांसह स्वराज्य परिवाराने गणरायाला उत्साह, भक्ती आणि जल्लोषात निरोप दिला. या मिरवणुकीत विद्यार्थी, मान्यवर आणि नागरिक सहभागी झाले होते. पाच दिवस चाललेल्या या सोहळ्यात श्रद्धा, संस्कार, सामाजिक बांधिलकी, सामूहिक उत्साह आणि ध्येय प्राप्तीचे संकल्प यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.