पाचोर्‍यात पिक नुकसान अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा; महसूल सहाय्यकासह प्रशिक्षणार्थीवर गुन्हा

 

जळगाव समाचार | १ सप्टेंबर २०२५

जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पिक नुकसान भरपाईच्या अनुदानात तब्बल एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन महसूल सहायक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

महसूल सहाय्यक अमोल भोई यांनी २०२२-२३ आणि २०२४-२५ या दोन वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या बनावट याद्या तयार करून अनुदानाची रक्कम अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली. नंतर त्या व्यक्तींशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्याकडून रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाकडून आलेली मदत खरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न देता गैरव्यवहारातून स्वतःच्या खिशात घालण्यात आली.

या घोटाळ्याचा पर्दाफाश शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर झाला. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा न झाल्याने यादी उघड झाली. भोई यांनी संबंधित लिपिकाला “ही खरी यादी नाही, माझ्याकडे खरी आहे” असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र यादी अधिकृत ग्रुपवर अपलोड झाल्यानंतर बनावट लाभार्थ्यांची नावे व आधार क्रमांक उघडकीस आले. आंबे वडगाव येथील तलाठ्यांनी यादी चावडीवर लावल्यावर घोटाळ्याची खात्री पटली.

जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत खोटे पंचनामे करून रक्कम वाटप झाल्याचे स्पष्ट झाले असून, अपहाराचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिस तपासातून व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणी संपूर्ण चौकशी सुरू असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here