अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २४ हजाराचा मिठाई साठा जप्त

 

जळगाव समाचार | २० ऑगस्ट

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत शिरसोली प्र.न., जळगाव येथे मोठी कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन येथे धाड टाकण्यात आली. तपासणीदरम्यान पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असून ते अन्न सुरक्षा व मानके कायदा नियमांना अपुरे असल्याचे आढळले.

सदर ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित १५१ किलो मिठाईचा साठा – अंदाजे २४,१३० रुपयांचा – जप्त करण्यात आला. हा साठा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याचा तत्काळ नाश करण्यात आला.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. आकाश बोहाडे, श्री. योगराज सुर्यवंशी, सौ. आकांक्षा खालकर व सौ. पद्मजा कढरे यांनी सहायक आयुक्त (अन्न) श्री. संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या मिठाई व इतर अन्नपदार्थांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here