जळगाव समाचार डेस्क | ५ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार रंगत असतानाच बोदवड तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या विनोद सोनवणे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर विनोद सोनवणे यांनी शिरसाळा येथील जागृती मारोती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतर बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार दौरा सुरू असताना अचानक कारमधून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
सुदैवाने या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही, परंतु या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजकीय क्षेत्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत, तर निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे उमेदवारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
विनोद सोनवणे यांनी या हल्ल्याबाबत दुजोरा दिला असून, त्यावरून निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात उमेदवारांवरील धोक्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.