जळगाव समाचार डेस्क| १८ नोव्हेंबर २०२४
जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून पहाटे चार वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन तसेच निवडणूक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेख अहमद हुसैन हे घरात झोपलेले असताना, त्यांच्या घराच्या दिशेने अज्ञात हल्लेखोराने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांच्या घरातील काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला असून भिंतींवर गोळ्यांचे छिद्र आढळून आले आहेत. या प्रकारामुळे ते तातडीने जागे झाले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांसह निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान घराजवळच्या रस्त्यावर तीन रिकामी काडतुसे आढळून आली. तसेच खोलीत एक गोळी सापडली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे ३:४२ वाजता एका मोटारसायकलस्वाराचे घराजवळून जाण्याचे दृश्य आढळले. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन हे AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, अधिकृत तिकीट न मिळाल्याने त्यांनी यंदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या घटनेबाबत कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
या घटनेने जळगाव शहरात निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निवडणूक काळात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक विभाग व पोलिसांनी योग्य ती सुरक्षा व्यवस्था तातडीने करण्याचे आश्वासन दिले आहे.