जळगाव समाचार डेस्क | ६ ऑक्टोबर २०२४
चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरातील चाळीमध्ये रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही आग चाळीतील दोन मजली घराला लागली होती. प्राथमिक माहितीनुसार, शॉकसर्किटमुळे मीटर बॉक्सला आग लागली आणि ती घरभर पसरली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यात 7 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
गुप्ता कुटुंबाचा दुर्दैवी अंत
सिद्धार्थ नगरमधील चाळीत अनेक घरं वन प्लस वन स्ट्रक्चरची आहेत, आणि यापैकी गुप्ता कुटुंबाचं घरदेखील त्याच प्रकारचं होतं. पहाटे अचानक लागलेल्या आगीची त्यांना झोपेत काहीच कल्पना नव्हती, आणि त्यामुळेच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पारिस गुप्ता (वय 7), मंजू प्रेम गुप्ता (वय 30), अनिता प्रेम गुप्ता (वय 39), प्रेम गुप्ता (वय 30), नरेंद्र गुप्ता (वय 10) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने अग्निशामक दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
क्षणार्धात आगीत घराचा नाश
पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणांतच संपूर्ण घराला विळखा घातला. अग्निशामक दलाच्या गाड्या व स्थानिक पोलीस घटनास्थळी त्वरित पोहोचले आणि आग विझवण्यात आली, मात्र तोपर्यंत गुप्ता कुटुंबाचं सर्वस्व या आगीत होत्याचं नव्हतं झालं होतं. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरातील लोक शोकमग्न
ही आग गायकवड मार्गाजवळील सिद्धार्थ कॉलनीत लागली होती, जो परिसर झोपडपट्टी स्वरूपाचा आहे. गुप्ता कुटुंबाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.