जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोहारा गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत गोठ्यातील शेतीसाठी उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
लोहारा येथील शेतकरी रामभाऊ ओंकार माळी यांनी गुरांसाठी व शेतीसाठी आवश्यक साहित्य ठेवण्यासाठी गोठा बांधला होता. सकाळी अचानक या गोठ्याला आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने ती नियंत्रणात आणण्यात अडचण येत होती.
गावातील सरपंच, पोलीस पाटील तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते आणि दोन म्हशी होरपळून गंभीर जखमी झाल्या होत्या.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला संपर्क साधण्यात आला. मात्र, शहादा येथून लोहारा गावाचे अंतर केवळ १५ मिनिटांचे असतानाही अग्निशमन दलाची गाडी तब्बल दोन तास उशिराने पोहोचली. त्यातही गाडीत फक्त अर्धेच पाणी होते, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. गावकऱ्यांनी या विलंबामुळे अग्निशमन विभागावर नाराजी व्यक्त केली आहे.
या आगीत शेतकऱ्याचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यातील पाइप, शेती उपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून गेले आहे. तसेच, गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार व कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर पोलीस व महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून शेतकरी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.