अमळनेर तालुक्यातील सात्री गाव 5 सिलेंडरच्या स्फोटाने हादरले; सात घरे जळून खाक…

जळगाव समाचार | ३ एप्रिल २०२५

अमळनेर तालुक्यातील सात्री गावात बुधवारी (२ एप्रिल) रात्री सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण गाव हादरले. या दुर्घटनेत सात ते आठ घरे जळून खाक झाली, तर वाऱ्यामुळे आग आणखी पसरली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सात्री गावातील एका खळ्याला अचानक आग लागली. या खळ्याच्या शेजारील घरात चार ते पाच गॅस सिलेंडर ठेवले होते. आगीने या सिलेंडरपर्यंत पोहोचताच मोठे स्फोट झाले आणि आजूबाजूची घरेही जळू लागली. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर धरणगाव, चोपडा आणि पारोळा येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीसाठी पोहोचल्या. प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले.

सात्री गाव तापी नदीच्या काठावर असल्याने तेथे पोहोचण्यासाठी नदीतून मार्ग काढावा लागतो. मात्र, अमळनेरहून निघालेले अग्निशमन दलाचे वाहन नदीतील वाळूत अडकले. शेवटी जेसीबीच्या मदतीने ते बाहेर काढण्यात आले आणि घटनास्थळी पोहोचवण्यात आले.

अमळनेर तालुक्यात दिवसभरात दोन आगीच्या घटना

बुधवारी अमळनेर तालुक्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. दुपारी अंबर्षी टेकडीवर आणि रात्री सात्री येथे आग लागली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here