जळगाव समाचार | १५ मे २०२५
भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांच्यावर बुधवारी रात्री महू मानपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
शाह यांनी एका सभेत कर्नल सोफिया कुरेशींना “दहशतवाद्यांची बहीण” म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. चार तासात एफआयआर नोंदवा, अन्यथा अवमान कारवाईचा विचार करू, असा इशारा न्यायालयाने पोलिसांना दिला होता.
या प्रकरणाविरोधात काँग्रेसने इंदूरच्या रिगल चौकात जोरदार निदर्शने केली. महिला मोर्चाने मंत्री शाह यांचा पुतळा जाळून निषेध केला.
दरम्यान, विवाद वाढल्यानंतर विजय शाह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. मला कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बहिणीपेक्षा जास्त आदर आहे.”
नक्वी यांची टीका
भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांना “मूर्ख” असे संबोधले.