जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून आपली तक्रार थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहे. यामुळे नागरिकांना सोयिस्कर पद्धतीने तक्रार नोंदवता येणार असून, पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस दलाने ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून तक्रार करताना नागरिकांना आपले नाव किंवा मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक नाही.
तसेच, पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाला मदत मिळावी यासाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आली आहे. येथे नागरिकांना अर्ज भरून मदत दिली जाईल. या सेवेबाबत नागरिकांना आपले मत नोंदवता यावे, यासाठी रेटिंग देण्याची सुविधाही देण्यात आली आहे. महिन्यातून एकदा या रेटिंगच्या आधारावर पोलीस स्टेशनचे मूल्यमापन केले जाणार आहे.
ही नवी सुविधा सुरू झाल्यामुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद अधिक प्रभावी होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.