जळगाव समाचार | २ मार्च २०२५
हरियाणातील रोहतक येथे काँग्रेसच्या सक्रिय महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांचा मृतदेह बस स्थानकाजवळील फ्लायओव्हरखाली एका सूटकेसमध्ये आढळून आला.
पोलिसांनी प्राथमिक तपासात ही हत्या गळा दाबून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
हिमानी नरवाल या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्या सोशल मीडियावरही सक्रिय होत्या. विशेष म्हणजे, त्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’त सहभागी झाल्या होत्या. मृतदेह आढळल्यावेळी त्यांच्या हातावर मेहंदी लावलेली होती, त्यामुळे त्या अलीकडेच एका विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर काँग्रेसने उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. रोहतकचे आमदार भारत भूषण बत्रा यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्याची मागणी केली आहे.
पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.