Monday, December 23, 2024
Homeआरोग्य156 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर केंद्र सरकारची बंदी; मेफेनामिक ऍसिड आणि...

156 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर केंद्र सरकारची बंदी; मेफेनामिक ऍसिड आणि पॅरासिटामोल औषधांचा समावेश…

 

जळगाव समाचार डेस्क| २३ ऑगस्ट २०२४

 

केंद्र सरकारने गुरुवारी 156 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांमध्ये अँटीबायोटिक्स, वेदनाशामक आणि मल्टीव्हिटामिनसारख्या औषधांचा समावेश आहे. तपासणीत आढळले की, ही औषधे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या औषधांच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधित FDC औषधांमध्ये अँटीबायोटिक्स, अँटी-एलर्जिक्स, वेदनाशामक, मल्टीव्हिटामिन तसेच ताप व उच्च रक्तदाबासाठीची औषधे यांचा समावेश आहे. औषध तंत्रज्ञान सल्लागार मंडळ (DTAB) आणि केंद्र सरकारने गठीत केलेल्या तज्ञ समितीच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.
केंद्र सरकार आणि DTAB ने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने या प्रकरणाची तपासणी केली. तपासणीत या दोन्ही संस्थांनी शिफारस केली की FDC औषधांमधील केमिकल्सचा कोणताही वैद्यकीय आधार नाही. यामुळे हे औषध आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
या बंदीच्या यादीत मेफेनामिक ऍसिड आणि पॅरासिटामोल इंजेक्शन यांसारख्या प्रमुख FDC औषधांचा समावेश आहे. ही औषधे विविध परिस्थितींमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरली जातात. ओमेप्राझोल मॅग्नेशियम आणि डायसायक्लोमाइन एचसीएल या औषधांचा वापर पोटदुखीच्या उपचारासाठी केला जातो.
ओमेप्राझोल मॅग्नेशियम आणि डायसायक्लोमाइन एचसीएल यांचे संयोजन असलेल्या प्रमुख ब्रँड्समध्ये मॅनकाइंड फार्माचा रानीस्पास आणि ज़ोइक लाइफसाइंसेसचा जेनस्पास यांचा समावेश आहे. इतर FDC औषधांमध्ये उर्सोडिऑक्सीकोलिक ऍसिड आणि मेटफॉर्मिन एचसीएल यांचे संयोजन आहे, ज्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरच्या उपचारासाठी केला जातो. तसेच पोविडोन आयोडीन, मेट्रोनिडाझोल आणि ऍलोच्या मिश्रणाचा वापर त्वचारोगाच्या उपचारासाठी केला जातो.
उर्सोडिऑक्सीकोलिक ऍसिड आणि मेटफॉर्मिन एचसीएल FDCचे प्रमुख ब्रँड्समध्ये एरिस लाइफसाइंसेस निर्मित हेपेक्सा एम टॅब्लेट यांचा समावेश आहे. मॅक्सुन बायोटेकचा मॅकडिन एएम ऑइंटमेंट आणि मेडक्योर फार्माचा पोविओल एम ऑइंटमेंट पोविडोन आयोडीन, मेट्रोनिडाझोल आणि ऍलोच्या संयोजनाचे उदाहरण आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, या FDC औषधांच्या वापरामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो, तर या औषधांचे सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. अधिसूचनेनुसार, DTABने या औषधांच्या दाव्यांना योग्य ठरवले नाही आणि हे औषध रुग्णांसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला. म्हणून, औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत या FDCच्या निर्मिती, विक्री किंवा वितरणावर प्रतिबंध घालण्याचे ठरविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page