जळगाव समाचार | २७ मे २०२५
कर्जाच्या ओझ्याला कंटाळून एका कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री पंचकुला (उत्तराखंड) येथील सेक्टर-२७ मध्ये घडली. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची तीन मुले आणि वृद्ध पालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ११२ आपत्कालीन क्रमांकावर माहिती मिळाली की सेक्टर-२७ मधील घराबाहेर उभी असलेल्या कारमध्ये काही लोक विष प्राशन करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधून सहा जणांना सेक्टर-२६ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एक मृतदेह कारमध्येच आढळून आला होता.
मृतांमध्ये प्रवीण मित्तल (वय ४०), त्यांची पत्नी अंजली मित्तल, तीन मुले – अद्वैत मित्तल (वय १२), अनुज मित्तल (वय १०), आणि अंश मित्तल (वय ७) यांचा समावेश आहे. तसेच प्रवीण मित्तल यांचे वडील देशराज मित्तल आणि आई (नाव अद्याप स्पष्ट नाही) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
प्रवीण मित्तल यांनी काही काळापूर्वी डेहराडूनमध्ये “टूर अँड ट्रॅव्हल्स” व्यवसाय सुरू केला होता. मात्र तो फारसा यशस्वी न झाल्याने त्यात मोठे नुकसान झाले. व्यवसायात सतत नुकसान होत असल्यामुळे कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि या ताणाखाली येऊन संपूर्ण कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून, कारचा नंबर डेहराडूनमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.