जळगाव समाचार | २० एप्रिल २०२५
प्रयागराज येथे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या झाशी येथील कुटुंबीयांच्या कारचा भीषण अपघात झाला. एका अनियंत्रित इर्टिगा कारने महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कानपूर-प्रयागराज महामार्गावरील सुजानीपूर वळणाजवळ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये आदित्य भार्गव यांचे वडील रामकुमार भार्गव, आई कमलेश भार्गव, मेहुणे पराग चौबे आणि नातेवाईक शुभम यांचा समावेश आहे. आदित्य भार्गव यांची पत्नी चारू आणि 12 वर्षीय पुतण्या काश्विक हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झाशीतील दीनदयाल नगरचे रहिवासी असलेले रामकुमार भार्गव रेल्वेत सीटीआय होते आणि 2014 मध्ये निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा आदित्य भार्गव नोएडामध्ये आपल्या पत्नी चारूसोबत राहत होता. दोघेही खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होते. आदित्य काही दिवसांपूर्वी उज्जैन आणि ओंकारेश्वर येथे फिरायला गेला असताना नर्मदा नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला होता. पाच दिवसांच्या शोधानंतर 16 एप्रिल रोजी त्याचा मृतदेह सापडला होता आणि 17 एप्रिल रोजी झाशी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री कुटुंबीय आदित्यच्या अस्थी विसर्जनासाठी प्रयागराजला निघाले होते. गाडीत रामकुमार, कमलेश, चारू, पुतण्या काश्विक, मेहुणा पराग आणि नातेवाईक शुभम हे सर्वजण होते. सकाळी आठच्या सुमारास सुजानीपूर वळणाजवळ भरधाव वेगाने असलेल्या इर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चुरडून गेला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीची काच फोडून जखमींना बाहेर काढले आणि सर्वांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रामकुमार, कमलेश, पराग आणि शुभम यांना मृत घोषित केले, तर चारू आणि काश्विक यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने झाशी शहरात शोककळा पसरली आहे.