जळगाव समाचार | ३ एप्रिल २०२५
जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात फेब्रुवारी महिन्यात ५० हून अधिक जन्मदाखल्यांची प्रकरणे दाखल झाली होती. मात्र, महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी या प्रकरणाची माहिती तहसीलदारांना दिली आणि तपास सुरू केला. तहसीलदार शितल राजपूत यांनी सांगितले की, या ४३ बनावट दाखल्यांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. तपास पूर्ण होताच, आज किंवा उद्या या प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यात यापूर्वीही रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे जळगावातील या प्रकरणातही बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने मागील सहा महिन्यातील सर्व जन्म-मृत्यू दाखल्यांचे रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, तहसीलदार कार्यालयाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.