एरंडोल-पारोळा मतदारसंघात लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज – जिल्हाध्यक्ष संजय पवार

(विक्रम लालवाणी) पारोळा, प्रतिनिधी

एरंडोल-पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून आग्रही भूमिका घेतली जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

पारोळ्यातील आरोग्य नायक म्हणून ओळख असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सायंकाळी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रदेश कार्यचिटणीस किशोर पाटील, आर. आर. पाटील, अरविंद मानकरी, नाटेश्वर पाटील, शाम पाटील, हर्षल पाटील, युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे आणि राष्ट्रवादीचे अनेक जिल्हा तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी अकरा हजार वह्यांचे वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या सामाजिक कामाचा आणि जनसंपर्क अभियानाचा धडाका पाहता, सातत्याने होणारे पक्ष प्रवेश आणि वाढता प्रतिसाद पाहता, एरंडोल-पारोळा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे संजय पवार यांनी सांगितले.

डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात नवी उभारी मिळाली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता, डॉ. पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी महायुतीकडून जोर लावला जाणार असल्याचे योगेश देसले यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात रक्तदान शिबीर, महापूजा, महापुरुष वंदन, वहितुला, तरवाडे येथे गोशाळेत ढेप दान, मोफत मोतीबिंदू शिबीर असे विविध उपक्रम राबवून डॉ. संभाजीराजे पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here