जळगाव समाचार डेस्क | १६ जानेवारी २०२५
एरंडोल शहरातील सावता माळीनगर परिसरात एकाच कुटुंबावर दुहेरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुलाबराव गिरधर पाटील (वय ७१) यांचे पुत्र प्रकाश पाटील यांच्या निधनानंतर केवळ १३ दिवसांतच तेराव्याच्या दिवशी पित्याचेही निधन झाले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुलाबराव गिरधर पाटील हे आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. सेवेनिवृत्तीनंतर ते परिवारासह एरंडोलच्या सावता माळीनगरमध्ये राहत होते. त्यांचे पुत्र प्रकाश पाटील हे सोनबर्डी येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक होते. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. मात्र, दीर्घ आजारामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला.
प्रकाश पाटील यांच्या निधनानंतर पाटील परिवार शोकमग्न होता. १३ दिवसांच्या तेराव्या विधीनंतर त्यांचे वडील गुलाबराव पाटील यांना सायंकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. अवघ्या दोन आठवड्यांच्या आत कुटुंबातील दोन व्यक्तींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने अनेकांना भावूक केले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.