जळगाव समाचार | १९ मार्च २०२५
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडीप्रकरणी फरार असलेला शिक्षक मंगेश हरी पाटील (वय ५५) याला अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. बीड रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर तो बसलेला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. अटक करण्याच्या प्रयत्नात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
मंगेश पाटील याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा गंभीर आरोप होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, तसेच हवालदार महेंद्रसिंग पाटील आणि लक्ष्मण पाटील यांनी तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर १४ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील बीड रस्त्यावर असलेल्या एका चहाच्या टपरीवर तो असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला अटक केली.
अटक टाळण्यासाठी मंगेश पाटीलने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला रोखले. त्यानंतर रात्री ८ वाजता त्याला एरंडोल पोलीस ठाण्यात आणून अधिकृतपणे अटक करण्यात आली.