ब्रेकिंग; दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार; छत्रपती संभाजीनगरात सिनेस्टाईल थरार…


जळगाव समाचार | २७ मे २०२५

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या अमोल खोतकरचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. वडगाव कोल्हाटी परिसरात सोमवारी रात्री ही चकमक घडली.

संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील बंगल्यावर काही दिवसांपूर्वी दरोडा पडला होता आणि सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली होती, मात्र मुख्य सूत्रधार अमोल खोतकर अद्याप फरार होता.

काल रात्री अमोल खोतकर पोलिसांच्या हाती लागला, पण त्याने गाडीने पोलिसांच्या अंगावर धाव घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोल ठार झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या एन्काउंटरमुळे दरोड्याप्रकरणातील सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here