स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला…

जळगाव समाचार डेस्क | २८ जानेवारी २०२५

गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ओबीसी आरक्षण आणि निवडणुका यावर अंतिम निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा पुढील सुनावणीसाठी 25 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.

राज्यात 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटत नसल्याने या निवडणुका होत नाहीत. राज्य सरकारने न्यायालयाला निर्णय लवकर घेण्याची विनंती केली होती.

शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. इतर पक्षांनीही मेळावे आणि बैठका घेऊन कार्यकर्त्यांना तयार करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. मात्र, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार असल्याने निवडणुका आणखी लांबल्या आहेत. सर्व पक्षांचे लक्ष आता न्यायालयाच्या निकालाकडे आहे. निवडणुकांसाठी वातावरण तापत असून, पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here