१३ जानेवारीला मतदान केंद्रांच्या खोल्या व परिसर प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे निर्देश

 

जळगाव समाचार | १३ जानेवारी २०२६

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला असून येत्या गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. यासंदर्भात महत्त्वाची सूचना जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ अंतर्गत शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक सभागृहे तसेच अंगणवाडीच्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वर्गखोल्या व परिसर निवडणूक कामकाजासाठी वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानुसार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांसाठी निश्चित केलेल्या खोल्या व परिसर पूर्णतः रिक्त करून प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दिवशी महानगरपालिकेचे कर्मचारी मतदान केंद्रांवर आवश्यक ती किरकोळ तयारी व व्यवस्था करणार आहेत. यासंदर्भात यापूर्वी दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी खोली व परिसर अधिग्रहणाबाबत संबंधित संस्थांना पत्र देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व्यवस्थापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, सामाजिक सभागृहांचे व्यवस्थापक तसेच संबंधित संस्थांनी निवडणूक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांसाठी निश्चित केलेल्या खोल्या वेळेत उपलब्ध झाल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे मत आहे. ही सूचना जळगाव शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा निवडणूक अधिकारी शानेश्वर ढेरे यांनी दिली असून, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सर्वांनी जबाबदारीने सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here