जळगाव समाचार | ६ जानेवारी २०२६
जळगाव महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, शहरात सध्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री व आमदार यांच्या उपस्थितीमुळे निवडणूक प्रचाराला विशेष रंग चढला आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये जळगाव शहराच्या विकासाचा पाया घालणारे माजी मंत्री सुरेश जैन यांचे नाव प्रचारात किंवा राजकीय चर्चेतही जवळपास अनुपस्थित असल्याचे चित्र दिसत आहे. ही बाब शहरातील अनेक नागरिकांसाठी आश्चर्याची ठरत आहे.
एकेकाळी विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेले जळगाव शहर राज्याच्या नकाशावर ठळकपणे आणण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात सुरेश जैन यांना जाते. उत्तर महाराष्ट्रात अद्वितीय अशी १७ मजली जळगाव महापालिकेची प्रशासकीय इमारत, व्यापारी संकुलांची उभारणी आणि रोजगारनिर्मितीचे उपक्रम ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची उदाहरणे मानली जातात. १९८५ मध्ये जळगाव नगरपालिकेतून राजकारणात प्रवेश केलेल्या जैन यांनी ‘जळगाव सिंगापूर व्हावे’ अशी दूरदृष्टी मांडत शहराच्या वेगळ्या ओळखीचा प्रयत्न केला होता.
राजकीयदृष्ट्या सुरेश जैन यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली. शिवसेना किंवा अन्य पक्षांशी संलग्नता असली तरी जळगाव महापालिका निवडणुका त्यांच्या समर्थकांनी खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या. या समीकरणामुळे विविध समाजघटकांचा पाठिंबा मिळत राहिला आणि शहरातील सत्ता प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वाखालीच कार्यरत राहिली. मात्र, २०१८ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आघाडीच्या नावाऐवजी थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने समीकरणे बदलली. परिणामी, बिगरहिंदू मतदारांचा अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला.
२०१८ मध्ये भाजपने गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५७ जागा जिंकून महापालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आणि त्यातून सुरेश जैन यांना मोठा राजकीय धक्का बसला. या पराभवानंतर त्यांनी शहराच्या सक्रिय राजकारणातून हळूहळू माघार घेतली. त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पुढे शिवसेनेच्या ठाकरे गटात स्थान घेतले, तर अलीकडे त्यापैकी काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. यंदा सुरेश जैन यांच्या प्रत्यक्ष सहभागाविना जळगाव महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच होत असून, गाजणाऱ्या प्रचारात त्यांचे अस्तित्व न जाणवणे ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

![]()




