जळगाव समाचार | १० नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि तीन नगर पंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत संपूर्ण निवडणूक कार्यक्रमासह जिल्ह्यातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची रचना आणि ईव्हीएम व्यवस्थेची माहिती दिली. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या सुमारे ८ लाख ८९ हजार असून त्यात पुरुष ४,५०,८९३, महिला ४,३८,९३८ आणि इतर ८३ मतदारांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी जिल्ह्यात ९७७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून १२९० कंट्रोल युनिट आणि २७४३ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४६४ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत ३४ एक सदस्यीय, २०६ दोन सदस्यीय आणि सहा तीन सदस्यीय प्रभागांचा समावेश आहे. तीन सदस्यीय प्रभागांत मतदारांना नगराध्यक्षांसह चार मते तर दोन सदस्यीय प्रभागांत तीन मते देण्याचा अधिकार असेल. जिल्ह्यात सुमारे ३० हजारांवर दुबार मतदारांची नोंद झाली असून त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याची हमीपत्रे घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एफएसटी, एसएसटी, व्हिजिलन्स, एमसीएमसी अशा सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी पाच कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिरिक्त २० टक्के कर्मचारी मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. ईव्हीएमची प्राथमिक चाचणी तसेच ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही घुगे यांनी सांगितले. प्रचाराच्या परवानग्यांसाठी एकल खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर असून छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्हवाटप २६ नोव्हेंबरला, मतदान २ डिसेंबरला तर मतमोजणी आणि निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर केले जातील.

![]()




