जळगाव समाचार डेस्क| २१ नोव्हेंबर २०२४
मतदान कर्तव्यावर असलेल्या उपशिक्षक लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९, मूळ गाव- बभळाज, ता. शिरपूर) यांचा दुर्दैवी मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मीकांत पाटील हे अनवर्दे-बुधगाव येथे निवडणूक कर्तव्यावर होते. त्यांनी बी.एल.ओ. म्हणून मतदान प्रक्रियेसाठी आपली जबाबदारी पार पाडली होती. काम पूर्ण करून ते आपल्या मूळ गावी बभळाज येथे परत जात असताना त्यांचा मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात त्यांचे निधन झाले.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने शोक व्यक्त केला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केल्या.