जळगाव समाचार डेस्क | १९ ऑक्टोबर २०२४
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड, मेंढोदे खडकाचे, उचंदे, शेमळदे, मेंढोळदे, पंचाणे, मेळसांगवे या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत आपल्या पक्षाच्या विकासकामांबाबत माहिती दिली.
यावेळी माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उपस्थित होते.
रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना उद्देशून सांगितले की, आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या असून, भविष्यातही ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही कार्य करण्यास वचनबद्ध आहोत. यावेळी त्यांनी स्व. प्रल्हाद भाऊ पाटील, स्व. पंढरीभाऊ पाटील, आणि स्व. शामरावजी तराळ यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार विचारधारेचे पाईक म्हणून नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिल्याचेही अधोरेखित केले.
रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या पुरोगामी विचारधारेचे अनुकरण करत मुक्ताईनगर मतदारसंघाने नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मताधिक्य दिले आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदान करून महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पवार साहेब कृषी मंत्री असताना केळीवरील करपा रोगाच्या निर्मूलनासाठी पॅकेज दिले होते. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र केळीवर आलेल्या सीएमव्ही रोगाकडे दुर्लक्ष केले. तसेच, केळी पिक विम्याच्या कठोर अटींमुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. एकनाथराव खडसे यांनी केळी विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे घोषणा आणि निधी जाहीर करूनदेखील ते स्थापन झाले नाही, असा आरोप त्यांनी केला.
“महामंडळ व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवा,” असे आवाहन आ. खडसे यांनी ग्रामस्थांना केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती सुधिर तराळ, माजी सभापती निवृत्ती पाटिल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटिल आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.