जळगाव समाचार डेस्क | ८ सप्टेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांनी आपल्या निवेदनात महायुतीच्या सरकारवर टीका करत फोडाफोडीचे राजकारण आणि सुडबुद्धीने होणाऱ्या ईडी-सीबीआय कारवायांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खडसे यांची भाजपमध्ये पुनःप्रवेशाची इच्छा असूनही, राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणपतीच्या मुहूर्तावर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महायुती सरकारला विरोध केला आहे.
खडसे यांनी राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेवरही टीका केली असून, ही योजना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणली असल्याचे जनतेला कळते, असे ते म्हणाले. त्यांनी या योजनेला विरोध नसल्याचे सांगितले, मात्र योजनेचा खर्च नॉन-प्लॅन असल्याने त्यातून धरणे बांधणे किंवा रस्ते निर्मितीसाठी वापर केला असता, तर रोजगार निर्मिती झाली असती, असा सल्ला खडसे यांनी दिला आहे.
माजी अर्थमंत्री असलेल्या खडसे यांनी अर्थ खात्याच्या कामकाजाचे समर्थन केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत, खडसे यांनी अर्थ खात्याचे नियोजन कसे महत्त्वाचे आहे, याबद्दल आपले मत व्यक्त केले.