‘माझा भाजप प्रवेश गणपती विसर्जनासोबत विसर्जित झाला’ – एकनाथ खडसे

0
56

जळगाव समाचार डेस्क | २१ सप्टेंबर २०२४

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गणपती विसर्जनासोबतच माझा भाजप प्रवेशही विसर्जित झाला असल्याचे स्पष्ट करत, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातच राहणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.

भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नाशिक दौऱ्यात होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानंतर निर्णय घेण्याचे संकेत दिले होते, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा होती. मात्र, भाजपकडून त्याची औपचारिक घोषणा न झाल्याने खडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

खडसे यांनी या प्रकरणाबद्दल मोठा गौप्यस्फोट करत, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे आपला भाजप प्रवेश थांबवण्यात आल्याचे सांगितले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्या रुपाली चाकणकर यांनी खडसे यांच्यावर टीका करत, ‘स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,’ असे वक्तव्य केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा खडसे यांनी केली होती. मात्र, काही कारणांमुळे हा प्रवेश होऊ शकला नाही. आता स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here