जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२६
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक व पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव महानगरपालिकाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लवकरच सुरू होणाऱ्या ई–बस सेवेसाठी १२० वाहक (कंडक्टर) मनुष्यबळ पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी महानगरपालिकेने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची ई–निविदा प्रसिद्ध केली आहे. २३ फेब्रुवारी २०२६ पासून या निविदेच्या सविस्तर अटी व शर्ती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या असून, इच्छुक व पात्र पुरवठादारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तांत्रिक पात्रता, आर्थिक अर्हता, संबंधित अनुभव व आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याची क्षमता या निकषांवर अंतिम निवड केली जाणार आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निविदा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले असून, कोणत्याही टप्प्यावर निविदा स्वीकारण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राखून ठेवण्यात आला आहे. शहर व परिसरातील प्रवाशांना नियमित, सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रशिक्षित वाहकांची आवश्यकता लक्षात घेऊन १२० पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई–निविदा प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने निवड प्रक्रियेत काटेकोरपणा व पारदर्शकता राखली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई–बस प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आगारातील वाहनतळाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. चार्जिंग स्टेशन, विद्युत पुरवठा यंत्रणा, देखभाल केंद्र व नियंत्रण कक्ष उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. जळगाव शहरासाठी एकूण ५० ई–बस मंजूर करण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात ३० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये १२ मीटर लांबीच्या २४ मोठ्या प्रवासी क्षमतेच्या बसेस मुख्य मार्गांवर धावणार असून, ९ मीटर लांबीच्या ६ मध्यम आकाराच्या बसेस उपनगर व अंतर्गत भागात सेवा देणार आहेत.
ई–बस सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली व डिजिटल तिकीट प्रणालीसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्युत उर्जेवर चालणाऱ्या या बसमुळे वायू व ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होऊन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. १२० वाहकांच्या नियुक्तीमुळे स्थानिक तरुणांना थेट रोजगाराची संधी मिळणार असून, देखभाल, तांत्रिक सेवा व व्यवस्थापन क्षेत्रात अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे. त्यामुळे ई–बस सेवा हा प्रकल्प शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवे पर्व सुरू करताना पर्यावरण संरक्षण व रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

![]()




