जळगाव समाचार | ३१ जानेवारी २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज शनिवारी पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याची ऐतिहासिक नोंद झाली असून त्या राज्याच्या १३ व्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले होते. हे पद कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. कालपासून वेगवान राजकीय हालचालींना वेग आला होता. अखेर रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठका आणि सल्लामसलतीनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
आज सकाळी विधान भवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील लोकभवन येथे आयोजित शपथविधी कार्यक्रमात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

![]()




