जळगाव समाचार डेस्क | ६ फेब्रुवारी २०२५
ज्येष्ठ क्रिकेट समालोचक, लेखक आणि स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या संझगिरी यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले संझगिरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागात प्रमुख अभियंता म्हणून कार्यरत होते आणि २००८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. परंतु, त्याचबरोबर ते उत्तम लेखक आणि समालोचक म्हणूनही प्रसिद्ध होते. १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून लेखन सुरू केले.
क्रिकेटविषयी त्यांची विशेष आवड होती. १९८३ पासून त्यांनी प्रत्येक क्रिकेट वर्ल्ड कपचे साक्षीदार म्हणून समालोचन केले. त्यांनी क्रीडा, सिनेमा, पर्यटन आणि सामाजिक विषयांवर सुमारे ४० पुस्तके लिहिली. त्यांच्या निधनाने क्रीडा आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्यावर उद्या (७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.