जळगाव समाचार | २८ मार्च २०२५
जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे, भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहे. रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसरा फरार झाला आहे. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
मलकापूरहून भुसावळला जाणाऱ्या दोन प्रवाशांवर रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात पाचशे रुपयांच्या नकली नोटांचे बंडल सापडले. विशेष म्हणजे, या बंडलमध्ये फक्त वरची नोट खरी होती, तर उर्वरित नोटांवर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेले होते.
रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण बॅग जप्त केली. तपासणी दरम्यान, एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
ही घटना गंभीर असल्याने रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिस (GRP) सतर्क झाले आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा मोठा गुन्हेगारी टोळीशी काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात आहे.

![]()




